पुस्तक वाचनाचे अनेक फायदे आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. पुस्तकांमुळे ज्ञानात भर पडते, कल्पनाशक्ती विकसित होते, शब्दसंग्रह वाढतो, संवादकौशल्य सुधारते, एकाग्रता वाढते आणि शुद्धलेखनालाही मदत होते.
पण तरीही आज अनेक मुलांना पुस्तक वाचायला सांगितले की, कंटाळा येतो.
याचे कारण फक्त मोबाईल आणि त्यावर घालवला जाणारा वेळ आहे का? तर नक्कीच नाही.
मला वाटते, हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने पाहायला हवा.
घरात वाचनाची संस्कृती आहे का?
आपण किती पालक मुलांसमोर नियमितपणे पुस्तक वाचतो? मुलांनी आपल्याला मोबाईलवर पाहण्यापेक्षा पुस्तक वाचताना किती वेळा पाहिले आहे? काही सवयी शिकवाव्या लागत नाहीत; त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून मुलांपर्यंत पोहोचतात.
आजची मुले गॅझेट्सकडे आकर्षित आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून ती जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यात काही गैर नाही. पण जग समजून घेण्यासाठी YouTube किंवा व्हिडिओ हे एकमेव माध्यम नाही, हे मुलांना अनुभवातून समजणेही गरजेचे आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही बालनगरीमध्ये मुलांसोबत पुस्तकांभोवती असेच एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
दररोज चित्रवाचन, गोष्ट सांगणे, गोष्ट वाचून दाखवणे, त्यावर नाटुकली बसवणे, गोष्टीचे लेखन करणे, स्वतः गोष्ट तयार करणे अशा अनेक उपक्रमांतून मुलांना हळूहळू पुस्तकांच्या जगाशी जोडण्याचा प्रयत्न केला.
आणि आज त्याचा परिणाम दिसतोय.
बालनगरीमध्ये मुले आली की सुरुवातीच्या वेळेत अनेकदा ती स्वतःहून आवडीचे पुस्तक घेऊन वाचायला बसतात. ज्यांना चित्र काढायचे असते, ती चित्र काढतात. ज्यांना गोष्टीवर काही लिहायचे असते, ती लिहितात. ज्यांना अजून वाचता येत नाही, ती मोठ्या मुलांकडून पुस्तक वाचून घेतात.
आणि कधी कधी तर मुलंच आम्हाला म्हणतात—
“दादा, ताई, मी पुस्तक वाचून दाखवतो, तुम्ही ऐका.”
किंवा,
“मी पुस्तक वाचलंय, तुम्ही मला प्रश्न विचारा.”
याहून सुंदर पुस्तकप्रेम काय असू शकते?
मुलांना पुस्तकांची आवड लावण्यासाठी नेहमी वेगळे तंत्र शोधण्याची गरज नसते. त्यांना वातावरण, पुस्तकांपर्यंत सहज पोहोच आणि आपला सहवास हवा असतो.
आपणही आपल्या हातातील मोबाईल थोडा बाजूला ठेवून मुलांसोबत पुस्तक घेऊन बसलो, त्यांच्यासोबत वाचले, त्यांना गोष्ट वाचून दाखवली, तर कदाचित आपल्याला अपेक्षित बदल फार दूर नाही.
एकदा करून पाहा!
कदाचित मुलं मोबाईल मागण्याऐवजी म्हणतील—
“चला, आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो.”



No comments:
Post a Comment