बालनगरीमध्ये जानेवारी महिन्यातील एक आठवडा मुलांसाठी विशेष ठेवला जातो. या आठवड्यात मुलांसाठी विविध आनंददायी खेळ आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये मुला-मुलींची पोत्याची शर्यत, एका मिनिटात फुग्यांच्या साहाय्याने जास्तीत जास्त ग्लास उचलण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि केवळ मुलांसाठी आयोजित केलेली ‘चपाती बनविणे’ ही स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
या प्रत्येक उपक्रमामागे वेगवेगळे उद्देश होते—मुलांनी समूहाने खेळण्याची भावना अनुभवावी, मुला-मुलींमधील भेदाभेद कमी व्हावा, एकमेकांना सहकार्य करण्याची सवय लागावी आणि त्यांना निखळ आनंद मिळावा. मुलांनी सर्वच स्पर्धांचा मनमुराद आनंद घेतला; मात्र सर्वाधिक उत्साह निर्माण झाला तो ‘मुलांनी चपाती बनविणे’ या स्पर्धेमुळे.
स्पर्धेची सूचना मिळाल्यापासूनच मुलांची तयारी सुरू झाली. कुणी चूल मांडली, कुणी काड्या गोळा केल्या, कुणी आग पेटवण्याचा प्रयत्न केला, तर कुणी पीठ भिजवायला घेतले. कधी पाणी जास्त झाले, तर कधी पीठ घट्ट झाले. योग्य प्रमाण काय असावे, हे समजून घेण्यासाठी कुणाचीही मदत न घेता मुले स्वतःच प्रयत्न करत होती. हा सगळा अनुभव जणू self-learning मधूनच घडत होता. मुलांची ही धडपड आणि त्यातून होणारे प्रयोग गावातील मंडळीही उत्सुकतेने पाहत होती.
“पोळी चंद्रासारखी गोल झाली पाहिजे,” असा सूर मधूनच ऐकू येत होता. काहीजण मुलांकडे पाहून, “यांना हे काय जमणार?” असे म्हणत होते, तर काहींचा प्रश्न होता, “हे सगळं का आणि कशासाठी करायचं?”
पण तिकडे मुलांचे लक्ष फक्त एका गोष्टीकडे होते—आपली चपाती सर्वांत चांगली कशी होईल?
कधी चुलीतील आग विझत होती, कधी एखाद्या चपातीचा आकार नकाशासारखा होत होता, तर कधी एखादी चपाती तव्यावर ठेवतानाच फाटत होती. तरीही मुलांची धडपड थांबत नव्हती. प्रत्येकजण पुन्हा प्रयत्न करत होता. चपाती बनवण्याची ही प्रक्रिया त्यांच्या दृष्टीने केवळ स्पर्धा नव्हती; ती त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अनुभव होती.
स्पर्धा संपल्यानंतर मुलांनी आपल्या घरून भाजी, चटणी आणि इतर पदार्थ आणले. तयार केलेल्या चपातींचे प्रदर्शन भरवण्यात आले आणि सर्वांनी मिळून त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. यानंतर उपस्थित गावकऱ्यांसोबत स्त्री-पुरुष समानता आणि घरातील जबाबदाऱ्या यावर संवाद साधण्यात आला.
आपण स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व मानतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात घरातील कामांची विभागणी करण्याची वेळ येते, तेव्हा स्वयंपाक, घराची स्वच्छता, मुलांची काळजी, कुटुंबातील इतरांची देखभाल अशा जबाबदाऱ्या प्रामुख्याने स्त्रियांच्याच वाट्याला येतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही या जबाबदाऱ्यांपासून सहज मुक्त होता येत नाही.
“पुरुषांनी बाहेरची कामे करायची आणि स्त्रियांनी घरातील कामे करायची,” हा नियम अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या स्वीकारला गेला आहे. त्यामुळे मुलींना लहानपणापासूनच घरकाम, स्वयंपाक, भावंडांची काळजी आणि कुटुंबाची देखभाल याचे प्रशिक्षण दिले जाते. ही परिस्थिती केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही; विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांमध्येही तिचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते.
वंचित घटकांतील मुलींच्या शिक्षणावर याचा थेट परिणाम होतो. आमच्या कामाच्या क्षेत्रात आम्ही आठ वर्षांच्या मुलींना संपूर्ण स्वयंपाक करताना पाहिले आहे. घरात लहान भावंड असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी ती शाळेत न जाता घरी थांबते. आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील, तर भावंडांच्या जेवणाची आणि घराची जबाबदारी तिच्यावर येते. कधी ही जबाबदारी नातेवाईकांकडे पाठवण्याच्या स्वरूपात येते, तर कधी पाहुणे आले म्हणून तिला शाळेत न पाठवता घरकामासाठी थांबवले जाते.
शाळेच्या वेळेत अंगापेक्षा जड हंडा उचलताना, मळक्या कपड्यांत घरकाम करताना किंवा खेळण्याच्या वयात भांडी घासताना एखाद्या मुलीला पाहणे अस्वस्थ करणारे असते. कारण तिच्या हातात त्या वयात पुस्तक, खेळणी आणि खेळाची संधी असायला हवी.
मग प्रश्न असा आहे—घर हे घरातील सर्व माणसांनी मिळून तयार केलेले असते, तर त्यासोबतच्या जबाबदाऱ्याही सर्वांच्या असायला नकोत का?
भूक सगळ्यांना लागते, तर जेवण बनवण्याची जबाबदारी केवळ तिचीच का? स्वयंपाक प्रत्येकाला करता यायला हवा, किंवा निदान तो एकत्रितपणे करता यायला हवा. स्वयंपाक ही केवळ स्त्रियांची जबाबदारी नसून एक महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. त्यासाठी लागणारे श्रम, वेळ आणि कौशल्य समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हा विचार केवळ सांगून मुलांच्या मनात रुजणार नाही. म्हणूनच बालनगरीमध्ये अशा विषयांवर कृतीतून शिकण्याच्या आणि अनुभवातून संवाद घडवून आणण्याच्या संधी निर्माण केल्या जातात. कारण विचारांना कृतीची जोड मिळाली, तरच तो विचार आपल्या जगण्याचा भाग बनतो.
‘चपाती बनवणे’ हा अनुभव अनेक मुलांसाठी आयुष्यातील पहिलाच अनुभव होता. पीठ मळण्यापासून चूल पेटवण्यापर्यंत आणि चपाती तव्यावर भाजण्यापर्यंत त्यांनी स्वतः प्रयत्न केले, चुका केल्या आणि त्यातून शिकले.
या छोट्याशा उपक्रमातून मुलांनी केवळ चपाती बनवायला शिकले नाही, तर “घरातील कामे ही कोणत्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसून घरातील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” हा विचार अनुभवातून घेतला.
आणि कदाचित याच प्रश्नापासून समानतेची सुरुवात होईल अशी आशा करूया..

.jpg)





