ओवीसोबत जोडण्यापूर्वी माझ्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. मला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. कुठे आणि कसे बोलायचे, एखाद्या परिस्थितीकडे कसे पाहायचे किंवा त्यावर आपले मत कसे मांडायचे, याबाबत माझ्यात फारशी स्पष्टता नव्हती. शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याचा किंवा मुलांसोबत काम करण्याचा अनुभवही मला नव्हता.
सुरुवातीला मी साथीदार म्हणून काम करत होतो. त्यानंतर मला एज्युकेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मला मुलांसोबत काम करायचे होते; पण ते कसे करायचे, मुलांना कसे शिकवायचे आणि त्यांच्या गरजा कशा समजून घ्यायच्या, हे मला माहीत नव्हते. तरीही मी ही जबाबदारी स्वीकारली.
मुलांसोबत काम करताना सुरुवातीला माझ्याकडून अनेक चुका झाल्या. त्या वेळी धम्मानंद दादा आणि प्रणाली ताई माझ्याशी सातत्याने चर्चा करायचे. ते मला सांगायचे की, चुकांतूनच माणूस शिकतो आणि घडतो. रोजच्या कामाचा विचार करणे, काय चांगले झाले, कुठे चूक झाली आणि पुढच्या वेळी काय बदल करता येईल, हे लिहून ठेवण्याची सवय त्यांनी मला लावली.
त्यासोबत मुलांबद्दलची पुस्तके, लेख आणि व्हिडिओ पाहण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. यातून मला हळूहळू समजू लागले की, मुलांसोबत काम करणे म्हणजे केवळ त्यांना शिकवणे नाही, तर त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार काम करणे आहे.
माझ्या कामातही त्यानुसार बदल होत गेला. मुलांना बोलके करण्यासाठी त्यांच्या अनुभवांशी संबंधित विषयांवर बोलायला लावणे, विचार करण्यासाठी पुस्तके वाचायला देणे, गोष्टी सांगणे, चित्र काढायला देणे आणि खेळातून शिकवणे अशा वेगवेगळ्या पद्धती मी वापरू लागलो. मुलांसोबत काम करताना माझाही संवाद सुधारत गेला आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करता आले.
या प्रवासाचा परिणाम माझ्या वैयक्तिक विकासावरही झाला. मी पुस्तके वाचायला लागलो, गाणी म्हणायला लागलो, लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास वाढला आणि एखाद्या विषयावर विचार करून मत मांडण्याची सवय लागली. त्यासोबत संगणक कौशल्य, टीममध्ये काम करणे, नियोजन आणि संस्थेच्या कामकाजाची समजही विकसित झाली.
माझ्यासाठी या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला येत नसतानाही शिकण्याची संधी मिळाली. माझ्या चुका नाकारल्या गेल्या नाहीत; त्या सुधारण्यासाठी मला मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ओवी माझ्यासाठी केवळ काम करण्याची जागा राहिली नाही, तर शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची जागा बनली.
आजही मला खूप काही शिकायचे आहे. पण दीड वर्षांपूर्वीच्या आकाशच्या तुलनेत आज माझ्यामध्ये स्वतःवर विश्वास आहे. मी शिकू शकतो, चुकू शकतो, त्या चुका सुधारू शकतो आणि जबाबदारी स्वीकारून काम करू शकतो, हा विश्वास या प्रवासातून निर्माण झाला.
ही संधी आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास यासाठी मी ओवी फाउंडेशनचे, धम्मानंद दादा आणि प्रणाली ताईंचे मनापासून आभार मानतो.
मला फक्त काम करण्याची संधी मिळाली नाही; मला स्वतःला घडवण्याची संधी मिळाली.

No comments:
Post a Comment