‘बेडा’ हा शब्द कदाचित आपण ऐकला असेल. पण धनगर समुदायासाठी बेडा हा केवळ काही दिवसांचा मुक्काम नाही; तो त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जीवनपद्धतीचा एक भाग आहे. पण हि जीवन पद्धत कशी आहे हे नक्की जाणून घ्या.
बेड्यातील जीवन हे कायमस्वरूपी घरापेक्षा वेगळे असते. तात्पुरता निवारा, मर्यादित पाणी, वीज आणि स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच आरोग्यसेवेपासूनचे अंतर—या सगळ्या परिस्थितीत कुटुंबे आपला दैनंदिन संसार पुढे नेत असतात.
या जीवनपद्धतीचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो.
कुटुंब जिथे जाते, तिथे मुलांनाही जावे लागते. त्यामुळे शाळेत जाण्यात खंड पडतो. गावात शाळा असूनही कुटुंबाचा मुक्काम बदलला की मुलांचा शाळेशी असलेला संबंध तुटतो. काही मुले पुन्हा गावात आल्यानंतर शाळेत परततात; काहींच्या शिक्षणात मात्र दीर्घ खंड पडतो. अशा प्रकारे स्थलांतर हे केवळ उपजीविकेचे वास्तव राहत नाही, तर मुलांच्या शैक्षणिक प्रवासावर परिणाम करणारे एक मोठे आव्हान बनते.
या परिस्थितीत महिलांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. पशुधनाची देखभाल, घरातील कामे, मुलांची जबाबदारी आणि स्थलांतराच्या काळातील दैनंदिन जीवन यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या काळातही आरोग्यसेवा सहज उपलब्ध नसणे, अंतर आणि वाहतुकीच्या अडचणी यामुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण होतात. याचा परिणाम आरोग्याबरोबरच जन्मनोंदणी, कागदपत्रे आणि पुढे मुलांना मिळणाऱ्या विविध शासकीय सेवांवरही होऊ शकतो.
मात्र या परिस्थितीकडे केवळ ‘वंचित’ किंवा ‘गरजू’ म्हणून पाहणे पुरेसे नाही. या जीवनपद्धतीमागे अनेक पिढ्यांची परंपरा, पशुपालनावर आधारित उपजीविका आणि जगण्याची स्वतःची पद्धत आहे. त्यामुळे प्रश्न त्यांच्या जीवनपद्धतीला बदलण्याचा नाही; तर या जीवनपद्धतीसोबत जगताना त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी कशा मिळतील, हा आहे.
याच प्रश्नातून ओवी फाउंडेशनचे काम सुरू होते.
धनगरवाडीमध्ये काम करताना आमचा प्रयत्न केवळ मुलांसाठी एक शिकण्याची जागा निर्माण करण्यापुरता मर्यादित नाही. मुलांचे शिक्षण स्थलांतरामुळे खंडित होऊ नये, त्यांचा शाळेशी संबंध टिकून राहावा आणि त्यांना सातत्याने शिकण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांच्या परिस्थितीला समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न आहे.
बालनगरीच्या माध्यमातून मुलांना वाचन, लेखन, गणित, जीवनकौशल्ये आणि विविध अनुभवाधारित उपक्रमांमधून शिकण्याची संधी मिळते. शिकण्याची प्रक्रिया केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता मुलांना प्रश्न विचारता यावेत, स्वतःचे विचार मांडता यावेत, खेळता-खेळता शिकता यावे आणि आपल्या अनुभवांशी शिक्षण जोडता यावे, यासाठी प्रयत्न केला जातो.
त्याचबरोबर पालकांशी संवाद साधणे, मुलांच्या शिक्षणातील अडथळे समजून घेणे आणि शक्य त्या पातळीवर त्यावर उपाय शोधणे हेही या कामाचा महत्त्वाचा भाग आहे.
या प्रक्रियेत बदल हळूहळू घडतो. एखादे मूल पुन्हा शाळेत येते, एखादे मूल पहिल्यांदा स्वतःहून पुस्तक हातात घेते, एखादे मूल आपले मत मांडते किंवा पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल अधिक सकारात्मकपणे विचार करू लागतात—हे छोटे वाटणारे बदल या प्रवासासाठी महत्त्वाचे असतात.
बेडा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे; पण तो त्यांच्या मुलांच्या भवितव्याची मर्यादा ठरू नये.
मुलगा गावात राहत असो किंवा काही दिवस बेड्यावर; त्याला शिकण्याचा, प्रश्न विचारण्याचा, स्वप्न पाहण्याचा आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे जाण्याचा समान अधिकार आहे.
म्हणूनच या समुदायासोबतचे आमचे काम त्यांच्या जीवनपद्धतीला नाकारण्याचे नाही, तर ती समजून घेत शिक्षणाच्या अधिक चांगल्या आणि सातत्यपूर्ण संधी निर्माण करण्याचे आहे.
हीच आमच्या कामाची दिशा आहे—
बेड्यापासून बालनगरीपर्यंत, आणि शिक्षणाच्या संधीपासून अधिक सक्षम भविष्यातील प्रवासापर्यंत.


No comments:
Post a Comment