Saturday, 9 July 2022

गोष्टीतील मानवी मूल्य

सध्याच्या डिजीटल युगात पुस्तकं हरवायला लागली आहे. मुले मोबाईल, गेमिंग आणि नवनवीन तंत्रज्ञान हाताळून पाहत आहेत. काही नामी कंपन्यांनी गोष्टीची  पुस्तकांच्या वेबसाईट,अँप्स् सुद्धा काढलेत पण या तंत्रज्ञानाचा वापर पुस्तकं वाचण्यासाठी मुले करतात का? तर निश्चितच आपल्याला हे सांगता येणार नाही. म्हणूनच मुले आणि आपण पुस्तकी जगापासून लांब जातोय कि काय अशी भीती वाटायला लागली आहे. 

मुलांची पुस्तकाशी मैत्री व्हायला हवी. याकरिता मुलांना बालवयापासूनच भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचायला द्यायला हवीत किंबहुना आपण वाचून दाखवायला हवीत. मात्र पुस्तके देतांना त्यातील आशय कसा असायला हवा? या आशयाच्या पुस्तकांसोबत काय करावं? याविषयी थोडं सांगू इच्छितो. 

आपल्याकडे जातककथा, बोधकथा, पौराणिक गोष्टी अशी पुस्तकं बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. परंतु या  बऱ्याच पुस्तकातील कथांमध्ये तात्पर्य वा बोध सांगितल्या शिवाय कथा पूर्णच होत नाही किंवा त्यातील पात्रे हे रंगानी, रूपांनी, किवा स्वभाव गुणांनी दुष्ट, वाईट स्वरुपाचे लिहिल्या शिवाय कथा पूर्ण होत नाही. खरंतर मुलांना त्यातून काहीतरी बोध होईल त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळेल अश्या समजेने हि पुस्तके लिहिली जात असावी. (लोभ करू नयेअति तेथे मातीगर्वाचे घर खालीखोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते. इद्यादी तात्पर्य वाचायला मिळतात.)

मग प्रश्न पडतो कि, तात्पर्य असलेली पुस्तके वाचून आपल्या आयुष्यात त्याचा नक्की उपयोग होतो का? यामुळे माझे भविष्यातील वर्तन सुधारण्यासाठी किव्हा जडणघडणीकरीता मदत होते का? निश्चितच आपण याबद्दलही  आपण ठाम असे काही सांगू शकत नाही. मग अशा तात्पर्य असणाऱ्या पुस्तकांचे करायचे काय? ती वाचून दाखवू नये का? किव्हा ती निरुपयोगी आहे म्हणून टाकून द्यावे? 

दुसरा मुद्धा असा कि, अशा पुस्तकांना आपण फार जास्त महत्व दिले आहे. हे माहिती असून सुद्धा कि, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्र विचारसरणी देखील आहे. हे तत्व जर आपल्याला मान्य असेल तर बोध असणाऱ्या पुस्तकांना आपण जास्त महत्व द्यायला नको आणि तीच तत्वे अगदी जशीच्या तशी मुलांना सुद्धा लागू होतात. उदाहरणार्थ, समजा मी दहा मोठ्या मंडळींच्या गटाला तात्पर्य न सांगता पुस्तक वाचून दाखवले आणि शेवटी काही प्रश्न केलेत कि, गोष्टीत काय होत? काय आवडलं? तर नक्कीच प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे येतील. कुणाला त्यातील पात्र आवडतील. कुणाला कथा, तर कुणाला घटनाक्रम. म्हणजेच काय तर वाचून दाखवलेल्या पुस्तकातून प्रत्येकांचा बोध हा स्वतंत्र होता. कारण, प्रत्येकाचे भाव विश्व, अनुभव यातून झालेली त्यांची धारणा.  त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा स्वत:ची विचारसरणी, भाव भावना, मते असतात आणि त्यानुसार व्यक्तीनुसार ते संदर्भ बदलत असतात. तात्पर्य म्हणजे शिकवण किंवा ते म्हणजे गोष्टीचे मर्म असे माणू नये व गोष्ट वाचून झाल्यावर शेवटी तात्पर्य सांगून मोकळे होवू नये. असे करून आपण मुलांच्या विचार प्रक्रियेला थांबवत असतो.

आम्ही मुलांसोबत पुस्तकांशी निगडीत 'गोष्टीवर चर्चा' असा उपक्रम घेत असतो. त्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी निगडीत व तात्पर्य नसलेली वाचण्यायोग्य पुस्तके आणि तात्पर्य असलेली अशी पुस्तके ज्यावर चर्चा घडून येवू शकते. अशा दोन गटात पुस्तकांची विभागणी करतो. मुलांसमोर सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचल्या गेली पाहिजे, असं आम्हचं मत आहे आणि ज्या पुस्तकांची निवड केली त्यात मानवी मूल्य जोपासली गेली असेल. कुणाची अवहेलना, विटंबना तर होत नाही ना, याची चाचपणी करतो. मग तात्पर्य न सांगता मुलांसोबत काम कसे करता येईल?  याकरिता आम्ही तात्पर्य असणाऱ्या पुस्तकातील गुराखी आणि लांडग्याची गोष्ट वाचून दाखवली. ती तुमच्याकरिता थोडक्यात अशी,

एका गावातील काही लोकं गुरांना चरायला जंगलात नेत असतात. दिवस भर जंगलात राहायचे असल्यामुळे ते सोबत दुपारच्या जेवणाचा डबा (शिदोरी) घेऊन जातात. सगळे गुराखी प्रत्येकाचा डबा एका झाडाच्या डोलीत ठेवतात आणि दुपार झाली की, एकत्र जेवण करतात. हे कोल्हा रोज पाहत असतो. एके दिवशी झाड्याच्या डोलीतील सगळ्या भाकरी कोल्हा खाऊन टाकतो. असे तो रोज करू लागल्यामुळे गुराख्यांची उपासमार होऊ लागली. दुसऱ्या दिवशी गुराख्यांनी कोल्हा आपल्या भाकरी खातो हे पहिले. आणि त्याला चांगली अद्दल घडवायची  असे ठरवले. सगळ्यांनी एकदा आपल्या  भाकरी झाडाच्या ढोलीत ठेवल्या. कोल्हाने पुन्हा भाकरी खाण्याचा प्रयत्न केला. सर्व गुराख्यांनी कोल्ह्याला घेरले आणि जवळ असलेल्या लाठी काठीने त्याला ठार मारले.

मग काय घडले गोष्टीत?

एक कोल्हा होता. तो गुराखींच्या भाकऱ्या खाऊन टाकत होता.

मग पुढे काय झालं?

त्या लोकांनी त्याला चांगला धडा शिकवला.

मला वाटते त्यांनी असं नको करायला होतं, म्हणजे त्याला मारायला नको होतं, तुम्हाला काय वाटतं?

त्यांनी बरोबर केलं दादा, त्याने भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याने चोरी केली. त्याच्यामुळे लोकांना उपाशी राहावं लागलं.

हो बरोबर आहे तुमचं. त्या कोल्ह्यामुळे त्यांना उपाशी रहावं लागलं? पण मग मला एका प्रश्नांचे उत्तर द्याल.. जर आपल्या पैकी कुणाला जर भूक लागली आणि त्याने मी घरी नसतांना घरी येऊन भाकरी खाल्ली तर मी काय करायला पाहिजे? 

(१) दादा, त्याला पकडून पोलिसात द्यायला पाहिजे.

(२) त्याला समजवायला पाहिजे, परत असे करू नकोस.

(३) त्याला कानाखाली लावायला पाहिजे.

मला तुमचं पटलं. आपण त्याला समजवायला पाहिजे, कि असे परत करू नकोस. आपण भाकरी खाल्ली म्हणून त्याला पोलिसात देणार नाही. कारण, त्याला भूक लागली असेल म्हणूनच त्याने भाकरी घेतली ना. मग भूक लागलेल्या माणसाला आपण मारणार का?

नाही दादा.

मी त्याला समज दिली असती.

आता मला दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर द्या. गोष्टीतील कोल्ह्याला पण भूक लागली असेल ना.

हो.

म्हणून तो भाकरी खात होता.

हो.

मग गुराख्यांनी काय करायला पाहिजे होतं?

दादा, त्याला मारून टाकायला नको होतं. त्याला सोडून द्यायला पाहिजे होतं.

पण जर त्याला परत भूक लागली आणि परत त्याने भाकरी चोरली असती तर?

त्या लोकांनी त्याच्याकरिता एक एक भाकरी अजून (अतिरिक्त) घेवून यायला पाहिजे होती, म्हणजे दोघांची पोटं भरली असती.

प्रथम त्या कोल्ह्याने वाईट केलं म्हणून त्याला ठार मारले हे योग्य होतं अशी मत असणारी मुले नंतर प्रत्येकाने एक भाकरी आणायला हवी या माणुसकीची आणि सहज उपायावरती येणे, माझ्यामते हि मुलांची मोठी वैचारिक उडी होती. कोणत्याही प्रकारची हिंसा करणे हे वाईटच. मग ती हिंसा छोट्या स्वरूपातील असो कि मोठ्या ‘ती हिंसाच असते’. मुलांना मानवी मूल्य आणि सद्भावनेची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना एक माणूस म्हणून विचार करायला लावणे अशा उपक्रमातून साध्य होतं आणि नक्कीच हि बाब सहजा-सहजी एका सत्राने येणारी नाहीच. याकरिता मुलांसमोर अशी पुस्तके घेवून त्यावर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करेने गरजेचे आहे. त्यातून प्रत्येक मुलाला स्वतःचे मत मांडायला मिळते. शिवाय माझे मत कसेही असले तरी ते ग्राह्य धरल्या जाते, माझ्या मताला इथे किंमत आहे आणि मी मांडलेल्या मतावर कुणी न हसता माझ्या मताचा इथे स्वीकार होतो. हा विश्वास निर्माण व्हायला मदत होते आणि यातूनच निर्माण होईल एक विचारमूल्य, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. 

- लेखन -

धम्मानंद

https://www.oveetrust.org/

Saturday, 18 June 2022

शिक्षण प्रवाहातील छकुली ?

बालनगरीमध्ये सध्या धनगर समाजाच्या ४० मुली शिक्षण घेत आहेत. बघायला गेलं तर इथे प्रत्येक मुलामुलींचा संघर्ष तुम्हाला सांगण्यासारखा आहे. त्यापैकीच एक म्हणजे आमची छकुली. सध्या ती ९ वर्षाची असून. नावाप्रमाणेच उंचीने लहान, अंगाने बारीक, मिश्कील हसणारी अशी ती. अगदी पहिल्या दिवसांपासून ती बालनगरीमध्ये दररोज येते. तिचे आई वडील जंगलात पाल टाकून बेड्यावर राहतात आणि ती आपल्या आजी सोबत गावात. तिच्या आई बाबांचे बेडं हे गावाच्या जवळच असल्यामुळे, ती कधी आई बाबांसोबत राहते, तर कधी आजी सोबत गावाला राहते. (जंगलात किंवा दुसऱ्यांच्या शेतात पाल टाकून त्या ठिकाणी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहणे. त्याला धनगरी समाजात बेडे किवा बेडं असे म्हणतात.) 

आम्ही जेव्हा जेव्हा दुपारच्या वेळेला बालनगरीला गेलो कितेव्हा तेव्हा आम्ही तिला डोक्यावर कळशी किव्हा हंड्याने पाणी भरतांनाच पाहिले. बहुतेक घरातील पाणी भरण्याची जबादारी तिलाच दिलेली असावी. असो, तिचे घाई-घाईने पाणी भरून झाले, कि केस बीस विंचरून छान तयारी करून बालनगरीला ती यायची. नंतर अचानक ती आपल्या आई- वडिलांकडे बेड्यावर राहायला गेली. पण तिने बालनगरीला येण्याचे टाळले नाही. शिकायची जिद्द आणि आवड असल्यामुळे ती दर दुपारी तीन वाजता बेड्यावरून आपल्या आजीसोबत एक पाण्याचा रिकामा हंडा घेवून बालनगरीला यायची. गटात बसून शिकायची आणि संध्याकाळचे साडे सहा वाजले किपाण्याचा हंडा भरून आजी सोबत परत बेड्यावर जायची. असे बरेच दिवस तिने जाने येणे केले.

स्वच्छ अंघोळ करून, वेणी बांधून, स्वच्छ आणि आवडीचा केशरी रंगाचा एकच ड्रेस घालून बालनगरीला नियमित वेळेवर येणे, प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे, खेळणे, गाणी म्हणणे, अभ्यास करणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, नाहीतर भिंतीवरील लावलेले उतारे वाचणे. असे न चुकता तिचे सुरु असायचे. दोन वर्षापूर्वी लिहिता वाचता न येणाऱ्या छकुलीला काही महिन्यातच १ ते ६० अंक ओळख आणि वाचन यायला लागले. अक्षर परिचय, शब्द आणि त्यापासूनची छोटी छोटी वाक्य वाचता येवू लागली होती. आम्ही जी गोष्टीची पुस्तकं रोज वाचून दाखवायचो ते पुस्तकं ती वाचून पाहण्याचा प्रयत्न करत होती. एकेक वाक्य असेलेली गोष्टीची छोटी पुस्तके तिला सहज वाचून समजून घेता येवू लागली. त्याचबरोबर गणितीक्रिया मध्ये बिनहातच्याचीहातच्याची बेरीज-वजाबाकी सुद्धा काड्या गट्याच्या सहाय्याने करता येवू लागली. एवढी सगळी काम करत एवढ्याश्या जीवाने शिक्षणाचा प्रवाह मात्र कधी तुटू दिला नाही.

शिक्षणाबद्दलची आवड आणि
जिद्द पाहून आम्ही भारावून गेलो आणि छकुलीची प्रगती तिच्या आई वडिलांना कळवावी असे आम्हाला वाटू लागले. एक दिवस वेळ काढून आम्ही छकुलीच्या बेड्यावर जायचे ठरवले. मोहन (छकुलीचा भाऊ) त्याला व छकुलीला सोबत घेवून जंगलाच्या वाटेने बेड्यावर पोहचलो. तिच्या आई वडिलांना भेटून छकुलीला लिहिता वाचता येतं, गणित करता येतं. ती कशी हुशार आहे. ती जर आज्जी सोबत गावातच राहिली तर तिचं शिक्षण चांगल होऊ शकेल. याविषयी आमच्या गप्पा झाल्या. 
आपल्या मुलांचं कौतुक ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. स्टीलच्या प्लेट मध्ये चहा घेत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

छकुलीने बरेच दिवस असेच सुरु असतांना अचानक एक दिवस आम्ही बालनगरीला जातांना मेंढ्यांचा कळप घेवून छकुलीची आजी आणि तिचा भाऊ जातांना दिसले. सोबत भलेमोठे सामान असलेली बैलगाडी आणि बाजूने आई, बाबा चालतांना दिसले. हे चित्र पाहून माझ्या मनात धक्क झालं. मी त्यांना विचारले, कोणत्या गावाला जात आहातपरत कधी येणार?

आता, सहा महिन्या नंतरच येवू.

आणि पोरांच्या शिक्षणाचं काय?

प्रश्नाचे उत्तर न देताच ते निघून गेले.

शिक्षणाच्या प्रवाहात येवू पाहणाऱ्या छकुलीला बघून जितका आनंद वाटत होता, त्यापेक्षा जास्त दुःख हे तिला प्रवाहातून बाहेर जातांनाचे होते. सहा एक महिन्यानंतर छकुली परत बालनगरीला आली खरी पण ती बरंच काही विसरलेली होती. आता तिला पुन्हा नव्याने त्याच गोष्टीकरिता संघर्ष करावा लागणार. परंतु असे किती दिवस ती करू शकेल? तिचा आई वडिलांना तिची धडपड, शिक्षणाविषयीची तिची तळमळ कळेल का? अशिक्षित, अंधश्रद्धा आणि शिक्षणापासून वंचित असलेला हा धनगर समाज हा पोटाची खडगी भरण्यासाठी अजूनही पारंपारिक व्यवसायच करतोय. मेंढपाळ व्यवसाय म्हणजे त्यांचा धर्मच जणू. अशा भटकंती प्रवाहाबरोबर शिक्षणाचे कार्य जरी अवघड असले, तरी अशा कितीतरी छकुली  ह्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांना प्रवाहात आणायचे असेल तर पालकांनी आपल्या मुलांप्रती जागृत होणे गरजेचे आहे.

(छकुली व तिची आजी)







Visit On: www.oveetrust.org

 









Sunday, 5 June 2022

पुस्तक चोरीला गेलं!

आमच्या मुलांना पुस्तकातील गोष्ट म्हणजे एखादा चित्रपटच वाटतो.  पुस्तकातील गोष्टी ऐकणे, वाचणे हे मुलांना खूप आवडतं. आम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचताना ते जर मोठ्या आशयाचं असेल तर ते आम्ही दोन भागात विभागून पुढील गोष्ट दुसऱ्या दिवशी वाचून दाखवतो. पण मुलांना तसं नको असतं. त्यांना पुस्तक कितीही मोठं असलं तरी त्या पुस्तकाच्या कथेत शेवटी काय घडतं हे जाणून घेण्याची उत्सुकता फार लागलेली असते.

आम्ही बालनागरी मध्ये 'जमिनीवरील ग्रंथालय' नावाचा उपक्रम घेत असतो. जमिनीवर पेपर अंथरून त्यावर पुस्तके ठेवली जातात व सर्वांनी एकेक करून ती वाचत बसायची. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी त्यातील चित्र बघून गोष्ट काय असेल याचा अंदाज घ्यायचा. एकदा असाच हा उपक्रम सुरु असतांना अर्धा तासानंतर अचानक मुले ओरडली. दादाSS, दादाss.

‘काय झालं?

दादा ! 'पुस्तक चोरलं', ओमशंकर म्हणाला!

कुणी नेलं?

दादा, तो पोरगा नवीन हाये. आज पहिल्यांदाच शाळेत आलाय. 

(पुस्तक चोरीला जाणं! हि घटना खूप भारी वाटली, पण आधीच पुस्तकाचा तुटवडा. नेलेलं पुस्तक परत आणून दिले तर ठीक. फाटले बिटले तर? असे विचार डोक्यात आले. घटना जरी छान असली तरी पुस्तक आणि पुस्तकवाला मिळायला  हवे, असा विचार करून मी मुलांना म्हणालो)

हो का? मग आता काय करायचं?

जाऊन घेऊन येवू का पुस्तक? आम्हाले त्याचं घर माहीत हाये.

बरं जा. पण त्याला मारू-बिरू नका आणि त्याला तुमच्या सोबतच घेऊन या?

हो दादा, असं म्हणून पाच दहा पोरं पळाली. तो मुलगा घरी न जाता कुठे तरी लपून बसलेला असावा. त्यामुळे तो मुलांना काही भेटला नाही. मुले बिचारी रिकाम्या हातानी आली आणि म्हणाली कि, तो काही गावला नाही दादा पण आम्ही त्याला शोधून काढतो आणि त्याच्याकडून पुस्तक पण घेऊन ठेवतो.’  

काही दिवसांनी बालनगरीचा दरवाचा बसवण्याचे काम सुरू होते. त्या कामात आम्ही व्यस्त होतो. मुलांना काही काम नसल्यामुळे ती आमच्या मागे-मागे फिरत होती. दरवाजा लावण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत होती. तितक्यात ओमशंकरला पुस्तक नेणारा मुलगा दिसला व त्याला पुस्तकाची आठवण झाली. मला काहीच न सांगता मुलं त्या मुलाला पुस्तकासाहित घेऊन आली. दादा ह्यो बघा, ह्यांनीच पुस्तक नेलं होतं. 

या मुलाने नेमकं कोणतं पुस्तक नेलेलं हे पाहण्यासाठी त्याच्याजवळील मी पुस्तक घेतलं. 

'आई समान कुणीही नाही!' असं त्या पुस्तकाचं नाव.


मला माहिती होतं कि, या मुलाला वाचता लिहिता येत नाही, मग पुस्तक त्याने का नेलं असावं? तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आई आणि मुलगा शिकार करतानाचे चित्र होते आणि आमच्या सगळ्या मुलांचे आयुष्य हे जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे कदाचित ते चित्र त्याला आवडले असावे. तो मुलगा कुणाशीही नजर मिळवत नव्हता. मी इतर मुलांना सांगितलं की, तो चोर नाही आहे, त्याला पुस्तक आवडलं होतं म्हणून त्याने ते नेलं. पण असं करायचं नाही, तुम्हाला जर पुस्तक वाचायला, पाहायला पाहिजे असेल तेव्हा मला एकदा सांगून घेऊन जा. ही पुस्तके सगळ्यांसाठीच आहेत. 

मुलांना मी ते पुस्तक दिले. पुस्तक हातात पडताच सगळी मुलं त्यातील चित्र पाहत बाकावर बसली होती. चित्रे पाहतांना मुले एकमेकांशी बोलू लागली. थोड्या वेळातच त्या पुस्तकाभोवती मुलांनी खुप गर्दी केली.

माझं लक्ष त्यांकडे होतं पण मनात विचार आला. ‘पुस्तक फाटेल की काय’. त्यावर मी त्यांना ते पुस्तक आत ठेवून द्यायला सांगितले. पण मुलांच्या हातून पुस्तक काही सुटेना. इकडे साडे सहा वाजायला आलेले, बऱ्यापैकी अंधार व्हायला सुरुवात झाली होती. तितक्यात पोरांनी दादा हे पुस्तक वाचून दाखवाणा असं म्हणत माझा हात ओढू लागली. चोरीला गेलेल्या पुस्तकात नेमकी कोणती कथा आहे, ज्यात शिकारीची इतकी भन्नाट चित्रे आहेत हे मुलांना जाणून घ्यायचे होते. मला हे लक्षात आलं. मग आम्ही आहे त्या स्थितीत मुलांना गोष्ट वाचून दाखवली. सोबतच ज्या मुलाने हे पुस्तक नेले होते त्यालाही समोर बसवले.

इकडे दरवाज्याचा ठकSS ठकSS ठकSS ठकSS असा आवाज आणि जोडीला सायंकाळचा अंधार त्यामुळे शिकारीची गोष्ट अजूनच रंगली. गोष्ट संपली आणि मुलं म्हणाली, ‘दादा, लय भारी होती गोष्ट!’ उद्या अजून एकदा वाचून दाखवाल.


-------------------------
अनुभव लेखन: धम्मानंद 
 www.oveetrust.org

Wednesday, 1 June 2022

गोष्टीच्या पलीकडे


बालनगरी मध्ये नियमित मुलांसाठी गोष्टीचे प्रकट वाचन, सहभागी वाचन केल्या जाते. वेगवेगळ्या आशयाची पुस्तके मुलांसमोर वाचली जाते. वाचनानंतर आम्ही त्या पुस्तकांवर चर्चा करतो. या चर्चेत मुले त्यांच्या भावविश्वातील, अनुभवातील मत मांडत असतात.

एकेदिवशी देखील असच झालं. पिहू आणि तिचे जादूई मित्र हे पुस्तक मी मुलांना वाचून दाखवत होते. पुस्तकातली पिहुची जादूई पेटी, त्यात असलेल्या रंगीबेरंगी पेन्सिली, खोडरबर आणि त्यांची जादू हे ऐकून मुलं दंगून गेली. आपलं पुरात वाहून जाणार गाव पाहून पिहुला वाईट वाटतं आणि या जादूई मित्रांच्या मदतीने ती गाव पुन्हा नव्या सारख करते. म्हणजे ती जे चित्र काढेल ते प्रत्यक्ष तसंच घडतं, ती जे खोडेल ते कायमच मिटून जात. त्यामुळे पाऊस, काळे ढग, पुरामुळे झालेलं नुकसान ती खोडरबर ने नष्ट करते आणि पेन्सीली च्या मदतीने जे जे हवं ते ते नवीन निर्माण करते.

आता गोष्ट वाचून झाल्यावर गप्पा करत असतांना मी मुलांना विचारलं,तुम्हाला जर अशी जादूची पेटी मिळाली तर तुम्ही काय निर्माण कराल?

एक एक करून मुलं सांगू लागली. हर्षा म्हणाला,आपल्या बालनगरी मध्ये सर्वाना बसायला पुरेशी जागा नाही, लहान मुलांना सारखं बाहेर, उघड्यावर, उन्हा तान्हात बसावं लागतं. त्यांच्यासाठी मी एक खोली (रूम) तयार करेन. दीपक म्हणाला, ‘मी आपल्या बालनगरीला रंग देवून नव्या सारखं बनवेल’. अंजना म्हणाली, ‘बालनगरी मध्ये लाईट, फॅन ची सोय नाही. मी लाईट फॅन काढेल.

वैष्णवी म्हणाली. ताई-दादा तुम्ही आमच्यासोबत जमिनीवर बसता. आमच्या शाळेत गुरुजींना टेबल खुर्ची असते. मी तुमच्यासाठी सर्व पोरांसाठी बसायला टेबल खुर्ची तयार करेन.

सोपान म्हणाला, ‘आपले साहित्य आणि खेळणी ठेवायला मी कपाट बनवेन. तर सोनू म्हणाली, ‘मी मोठा फळा तयार करेन’.

अशा प्रमाणे एकेक करून मुलांनी आपआपली मते मांडली. कुणी म्हणाले, आपलं गाव सुद्धा नव्या सारख करू. पाणी,लाईट, रस्ते, घर, सगळं छान तयार करू आणि त्यापेक्षा जास्त बालनगरी मध्ये मोठी इमारत, सर्वांना राहण्यासाठी होस्टेल आणि खेळायला ग्राउंड (मैदान) करू.

मुलांची उत्तरे ऐकून मी खूप भारावून गेले. मुलं किती बारकाईने आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती कडे बघतात, आपल्या सोबतच्या लहान गटातल्या मुलाबद्दल त्यांना वाटणारी काळजी. आपण शिकत असलेल्या परिस्थितीची जाणीव. आपल्या सामुदायिक गरजा. भविष्यवेधी असलेली दृष्टी. आम्हाला प्रश्न पडला कि, कुणी सांगितलं असेल या चिमुकल्यांना ह्या गोष्ठी. आम्ही तर यावर कधी बोललो सुद्धा नाही. मिळेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना फक्त शिकवत गेलो. मुल केवळ स्वत: चा विचार न करता. करत असलेला सर्वसमावेशक विचार आणि  त्यांचा संवेदनशील दृष्टिकोन मला खूप ऊर्जा देऊन गेला.

गोष्टी वाचनाने मुलांचा भाषिक विकास होतो. मुल विचारशील, संवेदनशील, चिकित्सक विचार करायला लागतात.  त्यासोबतच मुलाचं भावविश्व समृध्द होत जातं. नवीन पुस्तक नवीन विचार दरवेळी आम्हाला असाच एक नवा अनुभव देवून जातो.

#balnagari #oveetrust.org

पालकनीती मासिकात प्रसिद्ध झालेला लेख त्याची ही लिंक

https://palakneeti.wordpress.com/2022/05/28/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87/#more-3574

गोष्ट बालनगरीच्या एक महिना सुट्टीतील....

दहा बाय चौदा आकाराच्या समाज मंदिरामध्ये बालनगरीचं काम गेल्या दोन वर्षापासून अविरतपणे सुरु आहे. विदर्भामध्ये मे महिन्यातील ऊन इतकं असतं कि, समाज मंदिरा मध्ये बसनं  सुध्दा कठीण होतं. म्हणून आम्ही सर्वांनी पंचवीस दिवस सुट्टी घेण्याचे ठरवले.
या पंचवीस दिवसात मुलांनी उन्हाळ्यातील लग्न, बेड्यावर (जंगलात पाल) टाकून राहणे ही सगळी कामे केली. पण काही मुले हि गावातच होती. 

पंचवीस दिवसांच्या सुट्टी नंतर आम्ही मे महिन्याच्या एक तारखेला येवू असं मुलांना आम्ही आधीच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मुलांना हे पक्क माहिती होतं की, आम्ही एक तारखेला येवू. 

गावामध्ये लग्न असल्यामुळे लग्नाकडील कुटुंबाकडे पाहुणे आले होते. आणि त्यांच्या घराचेही बांधकाम अपूर्ण असल्यामुळे पाहुण्यांना समाज मंदिरामध्ये आरामाकरिता बालनगरीची मागणी केली. गावातील मंडळीनी 'काही हरकत नाही'  असे म्हणून परवानगी दिली. परंतु मुलांना हि गोष्ट काही आवडली नाही. त्यांनी त्या कुटुंबाला चावी देण्यास नकार दिला.

'ती आमची शाळा आहे. त्यातलं काही चोरी गेलं तर?' 
'अरे, फक्त आरामाकरिताच हवी आहे रूम.'
'ताई दादा आले तरच आम्ही ती रूम उघडतो. ते आल्या शिवाय आम्ही कुणालाही चावी देणार नाही'.
'तुमचे ताई दादा आता काही येणार नाही, गुमान चावी देवून टाका.
'पण बालनगरीचं काही सामान चोरीला गेलं तर ?'
अरे असे काही होणार नाही. लोकांनी त्यांना गप्प केलं. 
गावातील एक व्यक्ती म्हणाला, 'समाज मंदिर सर्वांचे आहे. अडीनडीला ते उपयोगाला आलेच पाहिजे.'
 
खरंतर यात दोन्ही कडील बाजू तितक्याच महत्वाच्या होत्या आणि मुलं वयानं लहान असल्यामुळे त्यांचं मोठ्यांसमोर फारसं काही चालू शकलं नाही. या सर्व वातावरणामध्ये मुलांना साहित्याची जास्त चिंता वाटायला लागली. शाळा उघडली कि, मुले, माणसे आत येणार आणि साहित्य सगळे मोकळे ठेवले आहे. ते जर चोरीला गेले तर.....?

मुलांचा नाईलाज होता त्यांनी कुटुंबाला चावी दिली व इकडे हर्शल, ओमशंकर, दीपक, मोहन या मुलांनी ठरवले कि, शाळा जर उघडली तर आपण सुद्धा पाहुण्यांच्या सोबत राहायचे. मग काय..मोठ्यांसोबत मुलंही बालनगरीत मुक्कामी राहिली .  यासोबतच मनसोक्त संगणकावर चित्रे काढणे, एक्सेल मध्ये वजाबाकी - बेरीज करणे. गाणी ऐकणे ही सगळी कामे मुलांनी केली आणि सोबतच शाळेतील वस्तूवर लक्षही ठेवल्या गेले. 

काल इतक्या दिवसानंतर मुलांना भेटल्यावर ही सगळी हकीगत मुलांनी सांगितली. तेव्हा असं लक्षात आलं , मुले लहान आहेत म्हणून पालक त्यांना लहानासारखेच वागवतात. तुला हे जमणार नाही,या गोष्टी तुला समजू शकणार नाही, असाच सूर कायम असतो.  परंतु आपण अस न करता, मुलांवर विश्वास टाकत त्यांना मोठ्या सारखं वागवलं, त्यांना झेपेल अश्या  जबाबदाऱ्या दिल्या, त्यांचे मनोबल वाढवले, समजू शकेल अशा पद्धतीने मार्गदर्शन केले आणि कोणतीही गोष्ट करतांना त्यातील बारकावे लक्षात आणून दिले तर मूले  ले खऱ्या अर्थानी ती आव्हाने आणि कर्त्यव्य पेलू शकतील...

कुल्फी अंकातील रहस्य.

  बबिताने चोरी केली का? 'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हा...