Saturday, 18 June 2022

शिक्षण प्रवाहातील छकुली ?

बालनगरीमध्ये सध्या धनगर समाजाच्या ४० मुली शिक्षण घेत आहेत. बघायला गेलं तर इथे प्रत्येक मुलामुलींचा संघर्ष तुम्हाला सांगण्यासारखा आहे. त्यापैकीच एक म्हणजे आमची छकुली. सध्या ती ९ वर्षाची असून. नावाप्रमाणेच उंचीने लहान, अंगाने बारीक, मिश्कील हसणारी अशी ती. अगदी पहिल्या दिवसांपासून ती बालनगरीमध्ये दररोज येते. तिचे आई वडील जंगलात पाल टाकून बेड्यावर राहतात आणि ती आपल्या आजी सोबत गावात. तिच्या आई बाबांचे बेडं हे गावाच्या जवळच असल्यामुळे, ती कधी आई बाबांसोबत राहते, तर कधी आजी सोबत गावाला राहते. (जंगलात किंवा दुसऱ्यांच्या शेतात पाल टाकून त्या ठिकाणी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहणे. त्याला धनगरी समाजात बेडे किवा बेडं असे म्हणतात.) 

आम्ही जेव्हा जेव्हा दुपारच्या वेळेला बालनगरीला गेलो कितेव्हा तेव्हा आम्ही तिला डोक्यावर कळशी किव्हा हंड्याने पाणी भरतांनाच पाहिले. बहुतेक घरातील पाणी भरण्याची जबादारी तिलाच दिलेली असावी. असो, तिचे घाई-घाईने पाणी भरून झाले, कि केस बीस विंचरून छान तयारी करून बालनगरीला ती यायची. नंतर अचानक ती आपल्या आई- वडिलांकडे बेड्यावर राहायला गेली. पण तिने बालनगरीला येण्याचे टाळले नाही. शिकायची जिद्द आणि आवड असल्यामुळे ती दर दुपारी तीन वाजता बेड्यावरून आपल्या आजीसोबत एक पाण्याचा रिकामा हंडा घेवून बालनगरीला यायची. गटात बसून शिकायची आणि संध्याकाळचे साडे सहा वाजले किपाण्याचा हंडा भरून आजी सोबत परत बेड्यावर जायची. असे बरेच दिवस तिने जाने येणे केले.

स्वच्छ अंघोळ करून, वेणी बांधून, स्वच्छ आणि आवडीचा केशरी रंगाचा एकच ड्रेस घालून बालनगरीला नियमित वेळेवर येणे, प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे, खेळणे, गाणी म्हणणे, अभ्यास करणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, नाहीतर भिंतीवरील लावलेले उतारे वाचणे. असे न चुकता तिचे सुरु असायचे. दोन वर्षापूर्वी लिहिता वाचता न येणाऱ्या छकुलीला काही महिन्यातच १ ते ६० अंक ओळख आणि वाचन यायला लागले. अक्षर परिचय, शब्द आणि त्यापासूनची छोटी छोटी वाक्य वाचता येवू लागली होती. आम्ही जी गोष्टीची पुस्तकं रोज वाचून दाखवायचो ते पुस्तकं ती वाचून पाहण्याचा प्रयत्न करत होती. एकेक वाक्य असेलेली गोष्टीची छोटी पुस्तके तिला सहज वाचून समजून घेता येवू लागली. त्याचबरोबर गणितीक्रिया मध्ये बिनहातच्याचीहातच्याची बेरीज-वजाबाकी सुद्धा काड्या गट्याच्या सहाय्याने करता येवू लागली. एवढी सगळी काम करत एवढ्याश्या जीवाने शिक्षणाचा प्रवाह मात्र कधी तुटू दिला नाही.

शिक्षणाबद्दलची आवड आणि
जिद्द पाहून आम्ही भारावून गेलो आणि छकुलीची प्रगती तिच्या आई वडिलांना कळवावी असे आम्हाला वाटू लागले. एक दिवस वेळ काढून आम्ही छकुलीच्या बेड्यावर जायचे ठरवले. मोहन (छकुलीचा भाऊ) त्याला व छकुलीला सोबत घेवून जंगलाच्या वाटेने बेड्यावर पोहचलो. तिच्या आई वडिलांना भेटून छकुलीला लिहिता वाचता येतं, गणित करता येतं. ती कशी हुशार आहे. ती जर आज्जी सोबत गावातच राहिली तर तिचं शिक्षण चांगल होऊ शकेल. याविषयी आमच्या गप्पा झाल्या. 
आपल्या मुलांचं कौतुक ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. स्टीलच्या प्लेट मध्ये चहा घेत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

छकुलीने बरेच दिवस असेच सुरु असतांना अचानक एक दिवस आम्ही बालनगरीला जातांना मेंढ्यांचा कळप घेवून छकुलीची आजी आणि तिचा भाऊ जातांना दिसले. सोबत भलेमोठे सामान असलेली बैलगाडी आणि बाजूने आई, बाबा चालतांना दिसले. हे चित्र पाहून माझ्या मनात धक्क झालं. मी त्यांना विचारले, कोणत्या गावाला जात आहातपरत कधी येणार?

आता, सहा महिन्या नंतरच येवू.

आणि पोरांच्या शिक्षणाचं काय?

प्रश्नाचे उत्तर न देताच ते निघून गेले.

शिक्षणाच्या प्रवाहात येवू पाहणाऱ्या छकुलीला बघून जितका आनंद वाटत होता, त्यापेक्षा जास्त दुःख हे तिला प्रवाहातून बाहेर जातांनाचे होते. सहा एक महिन्यानंतर छकुली परत बालनगरीला आली खरी पण ती बरंच काही विसरलेली होती. आता तिला पुन्हा नव्याने त्याच गोष्टीकरिता संघर्ष करावा लागणार. परंतु असे किती दिवस ती करू शकेल? तिचा आई वडिलांना तिची धडपड, शिक्षणाविषयीची तिची तळमळ कळेल का? अशिक्षित, अंधश्रद्धा आणि शिक्षणापासून वंचित असलेला हा धनगर समाज हा पोटाची खडगी भरण्यासाठी अजूनही पारंपारिक व्यवसायच करतोय. मेंढपाळ व्यवसाय म्हणजे त्यांचा धर्मच जणू. अशा भटकंती प्रवाहाबरोबर शिक्षणाचे कार्य जरी अवघड असले, तरी अशा कितीतरी छकुली  ह्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांना प्रवाहात आणायचे असेल तर पालकांनी आपल्या मुलांप्रती जागृत होणे गरजेचे आहे.

(छकुली व तिची आजी)







Visit On: www.oveetrust.org

 









Sunday, 5 June 2022

पुस्तक चोरीला गेलं!

आमच्या मुलांना पुस्तकातील गोष्ट म्हणजे एखादा चित्रपटच वाटतो.  पुस्तकातील गोष्टी ऐकणे, वाचणे हे मुलांना खूप आवडतं. आम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचताना ते जर मोठ्या आशयाचं असेल तर ते आम्ही दोन भागात विभागून पुढील गोष्ट दुसऱ्या दिवशी वाचून दाखवतो. पण मुलांना तसं नको असतं. त्यांना पुस्तक कितीही मोठं असलं तरी त्या पुस्तकाच्या कथेत शेवटी काय घडतं हे जाणून घेण्याची उत्सुकता फार लागलेली असते.

आम्ही बालनागरी मध्ये 'जमिनीवरील ग्रंथालय' नावाचा उपक्रम घेत असतो. जमिनीवर पेपर अंथरून त्यावर पुस्तके ठेवली जातात व सर्वांनी एकेक करून ती वाचत बसायची. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी त्यातील चित्र बघून गोष्ट काय असेल याचा अंदाज घ्यायचा. एकदा असाच हा उपक्रम सुरु असतांना अर्धा तासानंतर अचानक मुले ओरडली. दादाSS, दादाss.

‘काय झालं?

दादा ! 'पुस्तक चोरलं', ओमशंकर म्हणाला!

कुणी नेलं?

दादा, तो पोरगा नवीन हाये. आज पहिल्यांदाच शाळेत आलाय. 

(पुस्तक चोरीला जाणं! हि घटना खूप भारी वाटली, पण आधीच पुस्तकाचा तुटवडा. नेलेलं पुस्तक परत आणून दिले तर ठीक. फाटले बिटले तर? असे विचार डोक्यात आले. घटना जरी छान असली तरी पुस्तक आणि पुस्तकवाला मिळायला  हवे, असा विचार करून मी मुलांना म्हणालो)

हो का? मग आता काय करायचं?

जाऊन घेऊन येवू का पुस्तक? आम्हाले त्याचं घर माहीत हाये.

बरं जा. पण त्याला मारू-बिरू नका आणि त्याला तुमच्या सोबतच घेऊन या?

हो दादा, असं म्हणून पाच दहा पोरं पळाली. तो मुलगा घरी न जाता कुठे तरी लपून बसलेला असावा. त्यामुळे तो मुलांना काही भेटला नाही. मुले बिचारी रिकाम्या हातानी आली आणि म्हणाली कि, तो काही गावला नाही दादा पण आम्ही त्याला शोधून काढतो आणि त्याच्याकडून पुस्तक पण घेऊन ठेवतो.’  

काही दिवसांनी बालनगरीचा दरवाचा बसवण्याचे काम सुरू होते. त्या कामात आम्ही व्यस्त होतो. मुलांना काही काम नसल्यामुळे ती आमच्या मागे-मागे फिरत होती. दरवाजा लावण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत होती. तितक्यात ओमशंकरला पुस्तक नेणारा मुलगा दिसला व त्याला पुस्तकाची आठवण झाली. मला काहीच न सांगता मुलं त्या मुलाला पुस्तकासाहित घेऊन आली. दादा ह्यो बघा, ह्यांनीच पुस्तक नेलं होतं. 

या मुलाने नेमकं कोणतं पुस्तक नेलेलं हे पाहण्यासाठी त्याच्याजवळील मी पुस्तक घेतलं. 

'आई समान कुणीही नाही!' असं त्या पुस्तकाचं नाव.


मला माहिती होतं कि, या मुलाला वाचता लिहिता येत नाही, मग पुस्तक त्याने का नेलं असावं? तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आई आणि मुलगा शिकार करतानाचे चित्र होते आणि आमच्या सगळ्या मुलांचे आयुष्य हे जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे कदाचित ते चित्र त्याला आवडले असावे. तो मुलगा कुणाशीही नजर मिळवत नव्हता. मी इतर मुलांना सांगितलं की, तो चोर नाही आहे, त्याला पुस्तक आवडलं होतं म्हणून त्याने ते नेलं. पण असं करायचं नाही, तुम्हाला जर पुस्तक वाचायला, पाहायला पाहिजे असेल तेव्हा मला एकदा सांगून घेऊन जा. ही पुस्तके सगळ्यांसाठीच आहेत. 

मुलांना मी ते पुस्तक दिले. पुस्तक हातात पडताच सगळी मुलं त्यातील चित्र पाहत बाकावर बसली होती. चित्रे पाहतांना मुले एकमेकांशी बोलू लागली. थोड्या वेळातच त्या पुस्तकाभोवती मुलांनी खुप गर्दी केली.

माझं लक्ष त्यांकडे होतं पण मनात विचार आला. ‘पुस्तक फाटेल की काय’. त्यावर मी त्यांना ते पुस्तक आत ठेवून द्यायला सांगितले. पण मुलांच्या हातून पुस्तक काही सुटेना. इकडे साडे सहा वाजायला आलेले, बऱ्यापैकी अंधार व्हायला सुरुवात झाली होती. तितक्यात पोरांनी दादा हे पुस्तक वाचून दाखवाणा असं म्हणत माझा हात ओढू लागली. चोरीला गेलेल्या पुस्तकात नेमकी कोणती कथा आहे, ज्यात शिकारीची इतकी भन्नाट चित्रे आहेत हे मुलांना जाणून घ्यायचे होते. मला हे लक्षात आलं. मग आम्ही आहे त्या स्थितीत मुलांना गोष्ट वाचून दाखवली. सोबतच ज्या मुलाने हे पुस्तक नेले होते त्यालाही समोर बसवले.

इकडे दरवाज्याचा ठकSS ठकSS ठकSS ठकSS असा आवाज आणि जोडीला सायंकाळचा अंधार त्यामुळे शिकारीची गोष्ट अजूनच रंगली. गोष्ट संपली आणि मुलं म्हणाली, ‘दादा, लय भारी होती गोष्ट!’ उद्या अजून एकदा वाचून दाखवाल.


-------------------------
अनुभव लेखन: धम्मानंद 
 www.oveetrust.org

Wednesday, 1 June 2022

गोष्टीच्या पलीकडे


बालनगरी मध्ये नियमित मुलांसाठी गोष्टीचे प्रकट वाचन, सहभागी वाचन केल्या जाते. वेगवेगळ्या आशयाची पुस्तके मुलांसमोर वाचली जाते. वाचनानंतर आम्ही त्या पुस्तकांवर चर्चा करतो. या चर्चेत मुले त्यांच्या भावविश्वातील, अनुभवातील मत मांडत असतात.

एकेदिवशी देखील असच झालं. पिहू आणि तिचे जादूई मित्र हे पुस्तक मी मुलांना वाचून दाखवत होते. पुस्तकातली पिहुची जादूई पेटी, त्यात असलेल्या रंगीबेरंगी पेन्सिली, खोडरबर आणि त्यांची जादू हे ऐकून मुलं दंगून गेली. आपलं पुरात वाहून जाणार गाव पाहून पिहुला वाईट वाटतं आणि या जादूई मित्रांच्या मदतीने ती गाव पुन्हा नव्या सारख करते. म्हणजे ती जे चित्र काढेल ते प्रत्यक्ष तसंच घडतं, ती जे खोडेल ते कायमच मिटून जात. त्यामुळे पाऊस, काळे ढग, पुरामुळे झालेलं नुकसान ती खोडरबर ने नष्ट करते आणि पेन्सीली च्या मदतीने जे जे हवं ते ते नवीन निर्माण करते.

आता गोष्ट वाचून झाल्यावर गप्पा करत असतांना मी मुलांना विचारलं,तुम्हाला जर अशी जादूची पेटी मिळाली तर तुम्ही काय निर्माण कराल?

एक एक करून मुलं सांगू लागली. हर्षा म्हणाला,आपल्या बालनगरी मध्ये सर्वाना बसायला पुरेशी जागा नाही, लहान मुलांना सारखं बाहेर, उघड्यावर, उन्हा तान्हात बसावं लागतं. त्यांच्यासाठी मी एक खोली (रूम) तयार करेन. दीपक म्हणाला, ‘मी आपल्या बालनगरीला रंग देवून नव्या सारखं बनवेल’. अंजना म्हणाली, ‘बालनगरी मध्ये लाईट, फॅन ची सोय नाही. मी लाईट फॅन काढेल.

वैष्णवी म्हणाली. ताई-दादा तुम्ही आमच्यासोबत जमिनीवर बसता. आमच्या शाळेत गुरुजींना टेबल खुर्ची असते. मी तुमच्यासाठी सर्व पोरांसाठी बसायला टेबल खुर्ची तयार करेन.

सोपान म्हणाला, ‘आपले साहित्य आणि खेळणी ठेवायला मी कपाट बनवेन. तर सोनू म्हणाली, ‘मी मोठा फळा तयार करेन’.

अशा प्रमाणे एकेक करून मुलांनी आपआपली मते मांडली. कुणी म्हणाले, आपलं गाव सुद्धा नव्या सारख करू. पाणी,लाईट, रस्ते, घर, सगळं छान तयार करू आणि त्यापेक्षा जास्त बालनगरी मध्ये मोठी इमारत, सर्वांना राहण्यासाठी होस्टेल आणि खेळायला ग्राउंड (मैदान) करू.

मुलांची उत्तरे ऐकून मी खूप भारावून गेले. मुलं किती बारकाईने आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती कडे बघतात, आपल्या सोबतच्या लहान गटातल्या मुलाबद्दल त्यांना वाटणारी काळजी. आपण शिकत असलेल्या परिस्थितीची जाणीव. आपल्या सामुदायिक गरजा. भविष्यवेधी असलेली दृष्टी. आम्हाला प्रश्न पडला कि, कुणी सांगितलं असेल या चिमुकल्यांना ह्या गोष्ठी. आम्ही तर यावर कधी बोललो सुद्धा नाही. मिळेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना फक्त शिकवत गेलो. मुल केवळ स्वत: चा विचार न करता. करत असलेला सर्वसमावेशक विचार आणि  त्यांचा संवेदनशील दृष्टिकोन मला खूप ऊर्जा देऊन गेला.

गोष्टी वाचनाने मुलांचा भाषिक विकास होतो. मुल विचारशील, संवेदनशील, चिकित्सक विचार करायला लागतात.  त्यासोबतच मुलाचं भावविश्व समृध्द होत जातं. नवीन पुस्तक नवीन विचार दरवेळी आम्हाला असाच एक नवा अनुभव देवून जातो.

#balnagari #oveetrust.org

पालकनीती मासिकात प्रसिद्ध झालेला लेख त्याची ही लिंक

https://palakneeti.wordpress.com/2022/05/28/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87/#more-3574

गोष्ट बालनगरीच्या एक महिना सुट्टीतील....

दहा बाय चौदा आकाराच्या समाज मंदिरामध्ये बालनगरीचं काम गेल्या दोन वर्षापासून अविरतपणे सुरु आहे. विदर्भामध्ये मे महिन्यातील ऊन इतकं असतं कि, समाज मंदिरा मध्ये बसनं  सुध्दा कठीण होतं. म्हणून आम्ही सर्वांनी पंचवीस दिवस सुट्टी घेण्याचे ठरवले.
या पंचवीस दिवसात मुलांनी उन्हाळ्यातील लग्न, बेड्यावर (जंगलात पाल) टाकून राहणे ही सगळी कामे केली. पण काही मुले हि गावातच होती. 

पंचवीस दिवसांच्या सुट्टी नंतर आम्ही मे महिन्याच्या एक तारखेला येवू असं मुलांना आम्ही आधीच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मुलांना हे पक्क माहिती होतं की, आम्ही एक तारखेला येवू. 

गावामध्ये लग्न असल्यामुळे लग्नाकडील कुटुंबाकडे पाहुणे आले होते. आणि त्यांच्या घराचेही बांधकाम अपूर्ण असल्यामुळे पाहुण्यांना समाज मंदिरामध्ये आरामाकरिता बालनगरीची मागणी केली. गावातील मंडळीनी 'काही हरकत नाही'  असे म्हणून परवानगी दिली. परंतु मुलांना हि गोष्ट काही आवडली नाही. त्यांनी त्या कुटुंबाला चावी देण्यास नकार दिला.

'ती आमची शाळा आहे. त्यातलं काही चोरी गेलं तर?' 
'अरे, फक्त आरामाकरिताच हवी आहे रूम.'
'ताई दादा आले तरच आम्ही ती रूम उघडतो. ते आल्या शिवाय आम्ही कुणालाही चावी देणार नाही'.
'तुमचे ताई दादा आता काही येणार नाही, गुमान चावी देवून टाका.
'पण बालनगरीचं काही सामान चोरीला गेलं तर ?'
अरे असे काही होणार नाही. लोकांनी त्यांना गप्प केलं. 
गावातील एक व्यक्ती म्हणाला, 'समाज मंदिर सर्वांचे आहे. अडीनडीला ते उपयोगाला आलेच पाहिजे.'
 
खरंतर यात दोन्ही कडील बाजू तितक्याच महत्वाच्या होत्या आणि मुलं वयानं लहान असल्यामुळे त्यांचं मोठ्यांसमोर फारसं काही चालू शकलं नाही. या सर्व वातावरणामध्ये मुलांना साहित्याची जास्त चिंता वाटायला लागली. शाळा उघडली कि, मुले, माणसे आत येणार आणि साहित्य सगळे मोकळे ठेवले आहे. ते जर चोरीला गेले तर.....?

मुलांचा नाईलाज होता त्यांनी कुटुंबाला चावी दिली व इकडे हर्शल, ओमशंकर, दीपक, मोहन या मुलांनी ठरवले कि, शाळा जर उघडली तर आपण सुद्धा पाहुण्यांच्या सोबत राहायचे. मग काय..मोठ्यांसोबत मुलंही बालनगरीत मुक्कामी राहिली .  यासोबतच मनसोक्त संगणकावर चित्रे काढणे, एक्सेल मध्ये वजाबाकी - बेरीज करणे. गाणी ऐकणे ही सगळी कामे मुलांनी केली आणि सोबतच शाळेतील वस्तूवर लक्षही ठेवल्या गेले. 

काल इतक्या दिवसानंतर मुलांना भेटल्यावर ही सगळी हकीगत मुलांनी सांगितली. तेव्हा असं लक्षात आलं , मुले लहान आहेत म्हणून पालक त्यांना लहानासारखेच वागवतात. तुला हे जमणार नाही,या गोष्टी तुला समजू शकणार नाही, असाच सूर कायम असतो.  परंतु आपण अस न करता, मुलांवर विश्वास टाकत त्यांना मोठ्या सारखं वागवलं, त्यांना झेपेल अश्या  जबाबदाऱ्या दिल्या, त्यांचे मनोबल वाढवले, समजू शकेल अशा पद्धतीने मार्गदर्शन केले आणि कोणतीही गोष्ट करतांना त्यातील बारकावे लक्षात आणून दिले तर मूले  ले खऱ्या अर्थानी ती आव्हाने आणि कर्त्यव्य पेलू शकतील...

कुल्फी अंकातील रहस्य.

  बबिताने चोरी केली का? 'कुल्फी' हा आमच्या मुलांचा आवडीचा अंक. या अंकाची मुले वाट पाहत असतात. बालकट्टा सेंटरला मुलांना कुल्फी अंक हा...